Thursday, 1 March 2012

भाषिक प्रमाद


दै० पुढारीच्या आज दि० १ मार्च २०१२च्या अंकात कृपा नॉट रिचेबल ह्या शीर्षकाने एक ठळक बातमी प्रसिद्ध झाली आहे. जी व्यक्ती आधीच रिच (कोणत्याही मार्गाने झालेली का असेना) आहे ती नॉट रिचेबल असे म्हणण्याचे प्रयोजन काय अशी शंका आली. म्हणून प्रमाण भाषालेखनाच्या अंगाने शोध घेऊ लागलो तेव्हा निरनिराळ्या वर्तमानपत्रांमधून अलीकडच्या काळात डिलिव्हरी बॉय नॉट रिचेबल (महाराष्ट्र टाइम्स, दि० २९ जानेवारी २०१२), एसटीसाठी तालुके नॉट रिचेबल (दिव्य मराठी, दि० १५ फेब्रुवारी २०१२) , पुलाअभावी आदिवासीपाडे नॉट रिचेबल (प्रहार, दि० १२ जानेवारी २०१२), सिंग यांचा दूरध्वनी नॉट रिचेबल (लोकसत्ता, दि० २३ नोव्हेंबर २०११), मुख्यमंत्री नॉट रिचेबल (सामना, दि० ११ नोव्हेंबर २०११) अशा प्रकारे नॉट रिचेबल असा उच्चारदृष्ट्या सदोष असलेला वाक्प्रचार रूढ केला गेला असल्याचे आढळून आले. रीच आणि रिच ह्यांमधला अर्थभेद लक्षात घेऊन नॉट रीचेबल असा वाक्प्रचार बनवला गेला तर त्याचे स्वागत करता येईल.  मग त्याचे मूळ परभाषेतून आलेले का असेना!

दुसरी बातमी लोकसत्तेच्या आज दि० १ मार्च २०१२च्या अंकातली आहे. श्रीकांत को गुस्सा क्यों आया!’ ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सदर बातमीत तुम्ही अशा चर्चा घडवणार असाल तर मी तुम्हाला मदत करू शकत नाही असे निवड समितीमधील श्रीकांतने म्हटल्याचे विधान आहे. मूळ विधान आय काण्ट हेल्प असे असून बातमीदाराने त्याचे शब्दशः भाषांतर करून दिले असल्याचे येथे उघड दिसते. त्याऐवजी मी काही करू शकत नाही असे म्हणायला हवे होते.

वर्तमानपत्रांकडून समाजाला निव्वळ बातम्या किंवा माहिती देण्याची अपेक्षा नसते तर समाजाचा शिक्षक ह्या नात्याने भूमिकाही वठवायची असते हे लक्षात घेऊन वरील दोष नजरेस आणले आहेत. असे दोष दूर व्हावेत व वर्तमानपत्रांचा दर्जा उंचावावा अशी अपेक्षा व्यक्त करावी काय?